बर्याच दिवसांनी वाट पाहून पाहून शेवटी एकदाचा पाऊस पडला.
आणि रस्त्यांबरोबर मन सुद्धा धुवून निघाले.
काही वर्षांपूर्वीचा असाच एक दिवस मला अचानक आठवून गेला.
... अशाच एका पावसात चिंब भिजून मी ऑफीस ला दांडी मारायच्या विचारात असताना माझ्या बॉस चा फोन आला.
अर्जेंट काम आहे म्हणून तो माझी वाट पाहत होता. हुशार असण्याचे काही तोटे असतात हे मला त्या दिवशी आवर्जून जाणवले.
ऐरवी मस्त घरी जाऊन मी आई ला आज गरम गरम भजी आणि चहाचा बेत आखणार होतो.
पण माधेच पचका झाला.
झक मारुन घरी आलो. कपडे बदलले आणि तसाच ऑफीस च्या दिशेने निघालो.
मनातून जाम वैतगलो होतो. पण काही उपयोग नव्हता.
आज बस आणि रिक्षा दोघेही माझ्यावर कृपा करत नव्हते.
चांगला अर्धा तास स्टॉप वर थांबून शेवटी मला एक रिक्षा भेटली.
रिक्षा मधे आधीच काही लोक कोंबलेले होते. त्यात आणखी माझी भर पडली.
शेजारी बसलेला माणूस सुसाट सिगरेट ओढत होता. कुणाला त्याचा त्रास होतो आहे की नाही ह्याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. बाजूच्या बाई च्या मांडीवर एक लहान पोरगं होतं. त्याची चप्पल चिखलाने माखाली होती.
त्याचे पाय राहून राहून मला लागत होते. जाम संताप येत होता. पण काय करणार. रिक्षा माझी नव्हती म्हणून सर्वांचे सोपस्कार मी नीट झेलत होतो.
शेवटी एकदाचे ऑफीस आले. सुटे पैसे असूनही मी रिक्षा वाल्याला काही ते दिले नाही.
त्या निमित्ताने मी माझ्या मनातली चीड व्यक्त केली.
रिक्षावाल्याने दिलेले प्रवचन ऐकून मी सरळ ऑफीस मधे शिरलो.
आतमधे गेल्यावर बॉस ने बोलावून घेतले.
"बाहेर काही मुली बसल्या आहेत. त्यांना आपण सेलेक्ट केले आहे. त्यांना कामाचे काय ते समजावून सांग" , बॉस म्हणाला.
मी मान हलवली आणि केबिन च्या बाहेर आलो.
बाहेर सर्वांना ही गोष्ट माहीत झाली होती.
अनेक लोक ऑफीस मधे असतांना माझी निवड त्या पोरींना ट्रेनिंग देण्यासाठी करण्यात आली होती.
मला अर्थात त्याच्यात काही इंट्रेस्ट नव्हता.
काही हुशार मंडळींनी लगेच येऊन माझे अभिनंदन वैगेरे केले.
मी सरळ त्यांच्या कडे वळलो.
3 जणी एका सोफ्यावर बसल्या होत्या.
तिघी बहुतेक मैत्रिणी असाव्यात. कारण मी जाण्याअगोदर त्या एकमेकींशी गप्पा मारत बसल्या होत्या.
त्यांच्या पैकी 1 जन जरा शांत होती. बाकीच्या दोघींनी आपण कसे हुशार आहोत ते मी न विचारता सांगायला सुरवात केली.
मला त्यात काही इंट्रेस्ट नाही हे बहुदा त्यांना समजले असावे.
बराच वेळ वायफळ बडबड करून त्या गप्प बसल्या.
मी त्यांना डेस्क दाखवला आणि काम सांगून निघून गेलो.
काही कारण नसतांना ती गप्प राहणारी मुलगी मात्र मनात घर करून गेली.
तिच्यात सुंदर म्हणावे असे काही नव्हते.
रंग सावळा. कळेभॉर डोळे. मोत्यासारखे स्वच्छ दात.
साधा पंजाबी ड्रेस, एक लांब वेणी.
कुठलाही मेकप नाही की लीप-स्टिक नाही.
बाकीच्या मुलींसारखा भपकेपणा नाही.
एकदम साधा पेहेनवा आणि शांत नजर.
खरच ती फारच सुंदर नाही पण आकर्षक मात्र नक्कीच होती.
काही लोकं दिसायला आकर्षक असतात.
एका नजरेने ते आपल्याला घायाळ करतात. अशीच काहीशी ती सुद्धा होती.
ती नुसतीच शांत नव्हती तर हुशार सुद्धा होती. थोड्याच दिवसात तिने सर्व काही आत्मसात केले.
मी ही मग थोडा वेळ मिळाला की मग तिच्या शेजारी जाऊन बसायला लागलो.
तिची हुशारी पाहून मी खरच थक्क झालो.
सर्व बोलत असतांना फक्त तिचा आवाज मला ऐकू यायचा.
मग गप्पांच्या नादात चहा होऊ लागला.
तासन्तास आम्ही एकमेकांशी गप्पा मारत बसायचो.
एरवी सुटी ची वाट पाहणारा मी मग ऑफीस ची वाट पहायचो.
तुम्ही म्हणाल की प्रेम वैगेरे झाले ह्याला. पण नाही निखळ मैत्री होती ती.
हो 3 वर्ष निखळ मैत्री होती आमची.
पण म्हणतात ना. "मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात होते" तेच झाले आमचे.
पण जेव्हा आम्ही मित्र - मैत्रीण होतो तेव्हा प्रेम हा शब्द आमच्या गावीही नव्हता.
आज काल फॅशन आहे. एका महिन्यात मुलं प्रेमात पडतात आणि 2 महिन्यात दुसरा जोडीदार निवडतात.
आपण कपडे बदलत नाही इतक्या लीलया ही लोकं पार्ट्नर्स बदलतात.
महिन्यभरच्या ओळखिला प्रेमाचे नाव देतात.
मला हे पटत नाही. प्रेम ही घाई घाई ने करण्याची गोष्ट नाही.
एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण असली म्हणजे ती / तो चांगला लाइफ पार्ट्नर असेलच असे नाही.
सच्चा प्रेमाला गरज असते ती निखळ मैत्रीची.
आज तीच 3 वर्ष मैत्रीण असलेली मुलगी माझी बायको आहे.
पण बायको पेक्षा ती माझी मैत्रीण आहे.
Yes she is my friend... A best friend.