Monday, June 29, 2009

आयुष्य

Saturday, June 20, 2009

मी पोरका झालो...

सकाळी 7.20 ची वेळ
ममांचा हॉस्पिटल मधून फोन आला.
"अण्णा गेले..."
काहीशी डोळ्यांची कडा ओळी झाली.
पहिला प्रश्न मनात आला तो "आई कशा अवस्थेत असेल..?"
काय करावे काही समाजेना. काही सुचेनसे झाले. डोळ्यासमोर अंधार आला.
अंगातून एकदम बळ नाहीसे झाल्यासारखे वाटले. सर्व त्रान नाहीसा झाला.

आढल्या दिवशीच आम्ही रात्री 11:30 पर्यंत हॉस्पिटल मधे होतो.
त्यावेळी असे काही घडेल ह्याची शंका सुद्धा आली नव्हती मनात.
कसाबसा तोंड धून मी गाडी काढली आणि हॉस्पिटल च्या दिशेने निघालो.
बरोबर भाऊ, वाहिनी आणि बायको होती. सुरवातीला वाटले की ड्राइविंग करता येईल की नाही.
एरवी काणांचे पडदे फाडणारे होर्न आज मला ऐकू येत नवते.
रस्त्यावरची गर्दी अचानक नाहीशी झाल्यासारखी वाटली.
सरवीकडे एक निरव शांतता जाणवत होती. मनात कुठलेही विचार नाहीत.
कसा बसा हॉस्पिटल मधे पोहोचलो.
मनातून मी खूप खचलो. ड्राइविंग करतांना हॉस्पिटल मधे गेल्यानंतर काय चित्र असेल ह्याचाच विचार रस्ता भर होता.
आजवर ज्यांना साधा कधी आराम करतांना पहिले नव्हते त्यांना आता अशा अवस्थेत पाहतांना मनात प्रचंड उलथापालथ होणार होती.

हॉस्पिटल मधे पोहोचलो.
रूम मधे पाऊल ठेवले. डोके जड पडले आणि हात पाय गळून गेले.
समोरच बेड वर आंणांचा देह शांत पडून होता. रूम मधे भयाण शांतता.
शेजारीच एका खुर्चिवर आई बसली होती. मला तिच्या कडे बघवेना.
आई च्या डोळ्यातला एक एक अश्रू माझा जीव घेऊन जात होता.
आई ला सांभाळायला हवे म्हणून मला रडू ही आले नाही.
मी फक्त आईच्या खांद्यावर हात ठेवून आंणांचा चेहरा बघत होतो.
एखाद्याने फटाक्यांची लड लावावी आणि एकाच वेळी सर्व फटाके पेटून उठावे असा माझ्या मनात कल्लोळ सुरू झाला.एखादा माणूस आपल्याला सोडून गेल्यावर त्याची किंमत आल्याला समजते, ह्याचा खरा अर्थ मला त्या दिवशी समजला.

... अण्णा म्हणजे माझे वडील.
वय साधारण 75 च्या आसपास.
आज पर्यंत कधीही दवाखाना माहिती नाही..कुठले व्यसन नाही की काही शौक नाही.
एकदम साधे व्यक्तिमत्व.
उभ्या आयुष्यात वडिलांनी कधी साधा 1 रुपया सुद्धा स्वताहा साठी खर्च केला नाही.
अगदी हालाकीच्या दिवसात त्यांनी आमच्या साठी जीवाचे रान केले.
नेहमी मुलांची काळजी केली. आम्ही 5 भावंड असूनही त्यांनी कधी कुणाला काही कमी पडू दिले नाही.
सर्वांना ग्रॅजुयेट / पोस्ट ग्रॅजुयेट केले.

साधारण 40 वर्षापूर्वी कपड्यानिशी वडिलांना त्यांच्याच भाऊ बंधूंनी घरातून ऐन दसर्‍याच्या दिवशी बेघर केले.
होते नव्हते ते सर्व हडप केले.
सोबत होती ती फक्त बायको...माझी आई.
अथक परिश्रम करून त्यांनी आम्हाला लहानाचे मोठे केले.
चांगली शिकवण दिली आणि स्वतहाच्या पायावर उभे केले.
मला अजुन आठवते, मी साधारण 9-10 वि ला असेल तेव्हा अण्णा रिटाइर झाले होते.
रिटाइर झाल्यानंतरही त्यांनी आम्हाला शिकवले.
MCS पर्यंत शिकवले. अगदी 1-1 रुपया वाचवून.

लहानपणी फार चीड यायची - एकाच बशित पाणीपुरी घेऊन आम्ही तिघे जन, म्हणजे मी, भाऊ आणि वडील, खायचो.
एकेकाला 2-3 पुर्‍या यायच्या..तेव्हा वाटायचे की इतके पैसे कशासाठी तुम्ही वाचवत आहात. पण नंतर कॉलेज ची फी भरतांना प्रत्येक वेळी जाणीव व्हायची की, "हो ह्याच दिवसा करिता तुम्ही तुमच्या पोटाला टाके घातलेत."
ज्याला आम्ही लहानपणी कंजूषपणा समजत असु त्यात कुठेतरी दूरदृष्टी होती हे कधी आम्हाला जाणवलेच नाही.
चाळीत लहानपणी कंजूष-कंजूष म्हणून हिणवले जात असतांना मन कुठेतरी दुखत होते. पण आज जेव्हा तेच चीडवनारे लोक घरी येतात आणि मी केलेल्या प्रगती कडे पाहून थक्क होतात तेव्हा आवर्जून तुमची आठवण होते.
आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे.

आज तुम्ही जाऊन महिना झाला पण आम्ही अजूनही सावरू शकलो नाही.
सर्वांसमोर बडबड करणारा मी, एकांतात मात्र तुमची आठवण काढत बसतो.
आणि मनातून अजूनही तो दिवस काही सरत नाही.
अनेक भावना आहेत मनात पण प्रत्यक्षात लिहितांना मात्र शब्दच सापडत नाही. हा थोडा फार प्रयत्न आहे माझा तुम्हाला श्रद्धांजली वाहण्याचा.

का कुणास ठाऊक पण मला रडू येत नाही...आणि आज ह्याच गोष्टीचा मला फार त्रास होतो आहे.
मनात खूप सारे विचार भरले आहेत..त्याचा घडा भरला आहे पण डोळ्यावाटे मला त्या व्यक्त करता येत नाहीएत.
म्हणून आज मी इथे माझे विचार सांडत आहे.

एखाद्या भांड्यात खूप मोती असावे आणि ते सर्व उचलतांना हातातून अनेक मोती निसटून जावेत असे काहीसे माझे हे लिहितांना होते आहे. तरी फक्त एवढेच म्हणेन की "आन्ना तुम्ही आमच्यासाठी खूप केलंत.. आणि सदैव आम्ही तुमचे ऋणी राहू..."

आपला -
अरविंद